गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, पण…; माजी मुख्यमंत्र्याचा गौप्यस्फोट; गुप्त बैठकांबाबत केला मोठा खुलासा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (१५ ऑगस्ट) एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. पण त्यांनी केंद्रात मंत्री करण्याची अट ठेवली होती, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तसेच गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास तयार होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्याबरोबर आमच्या गुप्त बैठकाही झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात मंत्री करण्याची अट ठेवली होती. मात्र, शेवटच्या क्षणी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या अटीमुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला नकार दिला, असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.“मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. आमचं सगळं ठरलं होतं. सोनिया गांधी यांची परवानगी देखील घेतली होती. पण त्यांनी (गोपीनाथ मुंडे) मंत्री करण्याची अट ठेवली होती, ते म्हणाले होते की मला इकडच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. मग तुमच्याकडे मला मंत्री करा. मला निवडणूकही लढावी लागेल. कारण हे दोघं, हे दोघं म्हणजे भाजपाचे नागपूरचे दोघं, ते मला निवडून येऊ देणार नाहीत. त्यावेळी जातीवादाचा विषय होताच”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

“ते (गोपीनाथ मुंडे) मला म्हणाले की मला मंत्री करा. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, एकदम कॅबिनेट मंत्री शक्य होईल की नाही? माहिती नाही. पण राज्यमंत्री करता येईल. आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनमध्ये न थांबता दुसऱ्या हॉटेलवर थांबलो. कारण कोणाला कळू नये. त्यावेळी माणिकराव ठाकरे आमचे अध्यक्ष होते. आमचं सर्व ठरलं, त्या प्रमाणे रात्री २ वाजता अहमद पटेल आणि आमच्या सर्वांच्या बैठका झाल्या. तेव्हा ते (गोपीनाथ मुंडे) भाजपाचे मोठे नेते होते. मात्र, ते भाजपात अत्यंत अस्वस्थ होते. तेव्हा त्यांनी मला काय-काय सांगितलं हे आता बोलणं योग्य नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

“त्यानंतर मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो. पण ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी राजकीय चूक झाली. कारण तेव्हा मी मनमोहन सिंग यांना न विचारता सोनिया गांधी यांना विचारलं आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रवेशाला हो म्हणालो होतो. मनमोहन सिंग यांनी मला विचारलं की तुम्ही त्यांना (गोपीनाथ मुंडे) परस्पर आश्वासन दिलं? मग मी म्हटलं की हो मॅडमला विचारलं होतं. तेव्हा ते मला म्हणाले की, विरोधी पक्षातील खासदाराला आपल्या पक्षात घेऊन थेट मंत्री करणं योग्य नाही. तेव्हा ते माझ्यावर रागावले होते. तेव्हा मी डोक्याला हात लावला आणि काय बोलावं हे मलाही कळेना. त्यानंतर मी परत आलो आणि गोपीनाथ मुंडे यांना सांगितलं की सॉरी हे काय शक्य होणार नाही आणि त्यामुळे मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकला नाही”, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles