राज्यातील हजारो भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ३१ मे २०२६ पर्यंत सर्व रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या भरतीमुळे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, केवळ सध्याचीच रिक्त पदे नव्हे, तर मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे रिक्त होणारी संभाव्य पदे देखील या भरती प्रक्रियेत समाविष्ट केली जाणार आहेत. यामुळे पदसंख्या वाढली जाणार आहे. तसेच जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शैक्षणिक संस्थांना त्यांच्याकडील रिक्त पदांची नोंदणी पवित्र पोर्टलवर करण्यासाठी १ ते ३१ मे हा कालावधी निश्चित करून देण्यात आला आहे.गेल्या वर्षी पार पडलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’परीक्षेसाठी सुमारे २ लाख २८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील ज्या १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी आपली ‘स्व-प्रमाणपत्रे’ पूर्ण केली आहेत. त्यांना या भरती प्रक्रियेत प्राधान्याने सहभागी करून घेतले जाणार आहे.
ही संपूर्ण भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे वशिलेबाजीला चाप बसणार आहे. तसेच सर्व शाळा व्यवस्थापनांना त्यांच्याकडील आरक्षणानुसार बिंदुनामावली तपासूनच जाहिरात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर जून महिन्यात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शाळांचे पसंतीक्रम नोंदवता येतील.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागा मुलाखतीशिवाय (केवळ गुणांच्या आधारे) भरल्या जातील. तर खासगी संस्थांना १ जागेसाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार असेल. उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पात्रतेनुसार विविध शाळांचे पसंतीक्रम ऑनलाईन निवडता येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शाळांमधील शिक्षकांचा तुटवडा दूर होऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


