अहिल्यानगर,: जानेवारी 2024 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 12 जून 2026 पर्यंत 870 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 जुलै रोजी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे.
100 ग्रामपंचायतींची पुन्हा सोडत
2024 व 2025 या दोन वर्षांत मुदत संपलेल्या 100 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत यापूर्वीच झालेली असताना राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा आरक्षण सोडत घेण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 770 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना कार्यक्रम हाती घेऊन तो अंतिम केला होता. आता 770 ग्रामपंचायतींबरोबरच गेल्या दोन वर्षांतील 100 अशा एकूण 870 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
कार्यक्रमाचा वेळापत्रक
त्यानुसार 12 जून 2026 रोजी 870 गावांत आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा होणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतनिहाय आरक्षण सोडतीचे प्रारूप 19 जून रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. या प्रारूप आरक्षणावर 25 जूनपर्यंत हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. प्राप्त हरकतींवर प्रांताधिकारी सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी 8 जुलैपर्यंत अधिसूचनेस मान्यता देणार असून, त्यांच्या मान्यतेनंतर 10 जुलै 2026 रोजी 870 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, श्रीरामपूर 27, राहाता 25, राहुरी 44, नेवासा 59, नगर 60, पारनेर 88, पाथर्डी 79, शेवगाव 48, कर्जत 55, जामखेड 49, श्रीगोंदा 62 अशा एकूण 870 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.


