राज्यातील काही भागात झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर येताहेत. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव झाला. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांच्या सख्ख्या भावाचाही सरपंचपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. त्यांचा निवडणुकीमधील हा पराभव माजी राज्य महिला आयोग्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पुण्यातील दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. दौंडच्या नांदूरमधील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत माजी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बोराटे यांचा दारुण पराभव झाला आहे.या निवडणुकीत उमेदवार विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल ३०४ मतांनी विजय संपादन केला. विशाल थोरात यांनी विजय मिळवत सरपंचपदावर आपली मोहर उमटवली. थोरात यांच्या विजयामुळे स्थानिक पातळीवर मोठी राजकीय घडामोड घडल्याचे मानले जात आहे.


