मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? स्वरुपानंद देशमुख म्हणाले ….

फक्त भावनेच्या आधारावर निवडणुका जिंकता येत नाहीत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागेवर कुटुंबातीलच व्यक्ती निवडून येईल, असेही नेहमीच होईल याचीही शाश्वती नाही. या विषयाची चर्चा करण्याचे कारण ठरत आहे मस्साजोगच्या सरपंचपदाची निवडणूक. खरंतर देशातील चार प्रमुख राज्य, बारामती-राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक अशा महत्त्वाच्या निवडणुका असूनही पाच ते सहा हजार लोकसंख्या असेलल्या मस्साजोग सारख्या गावाची चर्चा राज्यपातळीवर होत आहे. याचे कारण म्हणजे दोन वर्षांपूर्वी निर्घृण हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा निवडणुकीतील पराभव…
माजी सरपंच संतोष देशमुख यांची ज्यापद्धतीने हत्या करण्यात आली, त्यावरून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. सर्व समाजाला घेऊन जाणारा, मनमिळावू, विकासाची दृष्टी असलेले संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सरपंचपदाची पोटनिवडणूक झाली. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र मागील निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद देशमुख यांनी पुन्हा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही लढत झाली.
राज्याचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांनी याचे श्रेय गावातील मतदारांना दिले. माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, माझ्यासमोर बलाढ्य लोक होते. भावनिक वातावरण त्यांच्याबाजूने होते. त्यांच्याकडे पैसाही होता. तरी गावातील मतदार माझ्यामागे खंबीर उभे राहिले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आधी न्यायाचा लढा लढावा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पण त्यांनी राजकारणात पडायला नको हवे होते. अश्विनी देशमुख यांना पुढे करून त्यांच्याआडून काही जणांनी राजकारण केले. पण मला आता त्यांच्यावर काहीही आरोप करायचे नाहीत.
“संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी माझ्या भगिनी अश्विनी देशमुख यांच्यापाठी मी शेवटपर्यंत उभा राहिल”, असेही स्वरुपानंद देशमुख म्हणाले.

संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख हे दोन वर्षांपासून सातत्याने हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माध्यमांसमोर कुटुंबाची बाजू मांडणे किंवा राजकीय पुढाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते पुढे येत असतात. यावेळीही पराभवानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, संतोष देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचे जे नुकसान झाले, त्यासमोर हा पराभव काहीच नाही. २० दिवसांच्या प्रचाराच्या काळात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या गावकऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. हा पराभव आम्ही स्वीकारतो.
धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्या नादाला लागल्यामुळेच अश्विनी देशमुख यांचा मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली. हा पराभव मनोज जरांगे , खासदार बजरंग सोनवणे तसेच जातीयवादी विचारसरणीच्या लोकांचा आहे. ग्रामपंचायतीनंतर धनंजय देशमुख यांना जिल्हा परिषदेचे डोहाळे लागले होते. धनंजय देशमुख मनोज जरांगेच्या आसपास राहून जातीय द्वेषाचे राजकारण करू लागल्यामुळेच दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला.

धनंजय देशमुख यांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेचे डोहाळे लागले होते. मात्र, मस्साजोगच्या लोकांनी जातीय आणि भावनिक राजकारण बाजूला सारून स्वरूपानंद देशमुख यांना निवडून दिले. त्यामुळे हा पराभव केवळ देशमुख कुटुंबाचा नाही तर मनोज जरांगे आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा असल्याचे वाघमारे यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles