सौंदाळाचे सरपंच शरद आरगडे यांनी घातला जिवंतपणी स्वतःचा दहावा

नेवासा -समाजात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच मृत्यूनंतरच्या कर्मकांडांबाबत असलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने सौंदाळा (ता. नेवासा) येथील लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी स्वतःचा जिवंतपणी दहावा घालून एक आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम राबविला. हा कार्यक्रम काल मंगळवार (दि. 21 एप्रिल) रोजी भेंडा येथील स्मशानभूमीत पार पडला.

यावेळी आरगडे यांच्या पत्नी प्रियांका आरगडे आणि मुलगा संग्राम आरगडे यांनी पारंपरिक दशक्रिया विधी व पिंडदान विधी पूर्ण केले. श्रीगोंदा येथील सत्यशोधक विधीकर्ते भीमराव कोथिंबीरे आणि उत्तरेश्वर मोहळकर यांनी विधी पार पाडला. विशेष म्हणजे पिंडदानानंतर काही क्षणांतच कावळ्याचा स्पर्श झाल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. या उपक्रमानिमित्त ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचे प्रबोधनपर प्रवचन झाले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते अविनाश पाटील, कॉ. बाबा आरगडे, शशिकांत गायकवाड आणि सरपंच भाऊसाहेब सावंत यांनीही विज्ञाननिष्ठ विचार मांडत समाजप्रबोधन केले.

यावेळी शरद आरगडे म्हणाले, अंधश्रद्धा अज्ञानातून भीती निर्माण करते, तर विज्ञान ज्ञानाच्या प्रकाशातून सत्य समोर आणते. छोट्या अंधश्रद्धांमधून मोठ्या अंधश्रद्धा निर्माण होतात आणि त्यातून भोंदूगिरीला खतपाणी मिळते. दहाव्याच्या ताटाकडे कावळा हा भुकेपोटी येतो, त्याचा मृत व्यक्तीशी काही संबंध नसतो.
आई-वडील मुलांच्या सुखासाठी आयुष्य घालवतात, तर त्यांचाच पितृदोष मुलांना कसा लागू शकतो? असा सवाल उपस्थित करत त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले.
मृत्यूनंतरच्या कर्मकांडांबाबत समाजात जागृती करणे, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी व मानवतावादी विचार रुजवणे, तसेच माणसाचा सन्मान जिवंतपणीच व्हावा हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे.
– शरद आरगडे, लोकनियुक्त सरपंच, सौंदाळा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles