शेवगाव शहरात बाजारातून खरेदी केलेल्या आंब्याचा रस पिल्यानंतर एका कुटुंबातील सात जणांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवार, दि. 16 मे रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित कुटुंबीयांवर उपचार करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरी रोड परिसरातील जाधव वस्ती येथील जाधव कुटुंबाने बाजारातून खरेदी केलेला आंब्याचा रस सेवन केला होता. काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना चक्कर येणे, उलट्या होणे, तोल जाणे आणि अस्वस्थता यांसारखी लक्षणे जाणवू लागली. परिस्थिती गंभीर होताच सर्वांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारांनंतर काही रुग्णांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारानंतर सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेत भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय (50), रेणुका भाऊसाहेब जायभाय (44), सागर भाऊसाहेब जायभाय (28), अभिजीत भाऊसाहेब जायभाय (24), पूनम सागर जायभाय (29), शीतल भाऊसाहेब जायभाय (29) आणि अवनी सागर जायभाय (4) हे प्रभावित झाले आहेत.
रासायनिक पदार्थामुळे विषबाधेची शक्यता नाकारता येत नाही
उपचार करणारे डॉक्टर डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले की, रुग्णांमध्ये अन्न विषबाधेसारखी लक्षणे दिसून आली आहेत. मात्र, केवळ अन्न विषबाधाच कारणीभूत आहे, असे निश्चितपणे सांगता येणार नाही. काही रासायनिक पदार्थांच्या सेवनामुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. आंबा आणि रसाची फॉरेन्सिक तपासणी झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल.
अन्न व औषध प्रशासनाकडून तपास सुरू
या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेतली असून संबंधित विक्रेता आणि आंब्याचा स्रोत याबाबत माहिती गोळा केली जात आहे. सहाय्यक आयुक्त गौतम जगताप यांनी सांगितले की, तपासात निष्काळजीपणा किंवा भेसळ आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी
तज्ज्ञांच्या मते, फळे लवकर पिकविण्यासाठी काही व्यापाऱ्यांकडून कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांनी फळे खरेदी करताना विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, तसेच फळे स्वच्छ धुऊन सेवन करावीत.


