शनि शिंगणापूर मोबाईल ॲप घोटाळ्याची विधानसभेत दखल
सुरेश धस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, सुरपुरीया यांनी दाखल केली होती तक्रार
नगर : शनि शिंगणापूर देवस्थानच्या मोबाईल ॲपमध्ये झालेल्या आर्थिक अनियमिततेची दखल अखेर राज्य विधानसभेतही घेण्यात आली. बीडचे आमदार सुरेश धस यांनी विधानभवनात लक्षवेधी सूचना मांडत या घोटाळ्याची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.
धस यांनी सांगितलं की, “शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. तिथं भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत, मोबाईल ॲपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारात मोठा घोटाळा झाला आहे. या संदर्भात शनिसई प्रतिष्ठानचे विश्वस्त विशाल सुरपुरीया यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे.”
या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं की, “या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील. कुणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. देवस्थान समित्यांमध्ये पारदर्शकता ठेवणं हे सरकारचं धोरण आहे. विशाल सुरपुरीया यांनी यापूर्वी या ॲपच्या कामकाजात झालेल्या अनियमितता, निधी वापरातील अपारदर्शकता आणि नियमबाह्य व्यवहारांची माहिती देत शासन दरबारी लेखी तक्रार केली होती. त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि देवस्थान समितीवर कारवाईची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर, सरकारकडून लवकरच चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.


