ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या काळात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील अंतर्गत धुसफूसीमुळे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिलेत. राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. त्याच दरम्यान सोलापुरात शरद पवार गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अभिजीत पाटील यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारीवर आक्षेप घेत बंडखोरीचे संकेत दिलेत. पक्षाने आपल्याला विश्वासात न घेता वसंत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली, असा आरोप पाटील यांनी केला. आता मला माझा पर्याय काढावा लागेल, असा थेट इशारा अभिजीत पाटील यांनी दिला आहे, यामुळे शरद पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिलंय. पक्षात हुकुमशाही राबवली जात असल्याचा आरोप आमदार अभिजीत पाटील यांनी केला होता, त्यावरून त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. वसंत देशमुख यांची उमेदवारी जाहीर करताना पक्षाने आपल्याला विचारातही घेतले नाही. कोणतीही माहिती न देताच पक्षाने देशमुखांना उमेदवारी देवून टाकली. इतकेच नाही तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीलाही आपणास बोलवले नाही. पक्ष उमेदवार देणार आहे, हेच मला माहिती नव्हते, असा गंभीर आरोप अभिजीत पाटील यांनी केला आहे.
अभिजीत पाटील यांनी उमेदवाराच्या निष्ठावंतावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. पंढरपूर येथील जुन्या राजकीय घडामोडींचा दाखला देताना ते म्हणाले की, पंढरपूरच्या सभापती पदाच्या निवडीवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या याच वसंत देशमुखांनी पक्षाशी गद्दारी केली होती आणि तुतारीचा अधिकृत उमेदवार पाडला होता. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला होता. ज्यांनी पक्षाचे नुकसान केले, त्यांना आता आम्ही मत का टाकायचे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.


