शरद पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत ,शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?

एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेली खळबळ शांत होत असतानाच आता राजकीय वर्तुळात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे या दोघांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधे शुक्रवारी बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय येऊ शकतं? याबाबत चर्चा झाल्याचे समजते. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा पार पडल्यानंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक वरिष्ठ नेता यांच्यातदेखील बैठक पार पडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत येत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय? असणार याबाबत चर्चा झाल्याची माहिती ‘एबीपी माझा’ला विश्वसनीय सूत्रांनी दिली. जयंत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याच मान्य केले. मात्र, बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली.

अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती. दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आले असते तर ते एनडीए सोबत राहिले असते की इंडिया सोबत? हा प्रश्न अजित दादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला आहे.

शरद पवार गटाचे राज्यात 10 आमदार आहेत. तर 8 खासदार आहेत. 8 खासदार असल्यामुळे शरद पवार गटाचं लोकसभेत वजन आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील सत्तेच्या मार्गावर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व चर्चा फेटाळून लावताना रोहित पवार म्हणाले, अशी फक्त चर्चा आहे. त्याला कुठेही तथ्य नाही’.‘आमची केंद्रात कोणत्याही एनडीएच्या नेत्या सोबतही चर्चा सुरू नाही. काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा सुरू नाही. तसेच राज्यातही कोणासोबत चर्चा चालू नाही. आज आम्ही विरोधतला पक्ष, पुरोगामी विचारांचा पक्ष, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 60 वर्ष भाजपच्या विचारांच्या विरोधात लढलेला पक्ष आहे. आज फक्त महाराष्ट्र धर्म आणि सर्वसामान्यांची भूमिका मांडत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles