मराठा समाजाचा अंतर्भाव मंडल आयोगावेळी न करणे हे शरद पवार यांचे पाप आहे, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या याच टीकेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हसत हसत उत्तर दिले. तसेच त्यांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण आदी प्रश्नांवर शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९४ साली मंडल आयोगात मराठा समाजाचा अंतर्भाव केला असता तर आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणे करण्याची वेळ आली नसती. हे शरद पवार यांचे पाप आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. त्यांच्या याच टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. १९९४ पासून आतापर्यंत विखे पाटील काय करतायेत, ते कुठे होते, अशी विचारणा करीत या टीकेला अर्थ नसल्याचेच शरद पवार अप्रत्यक्षपणे म्हणाले. हसत हसतच त्यांनी विखे पाटलांवर पलटवार केला.
पंतप्रधान मोदी बारामतीला येतो म्हणाले आहेत. आम्ही त्यांना १६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. पण ती पुढे मागे होण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इन्स्टिट्यूट इथे उभी केली आहे. ती देशातील पहिलीच संस्था आहे. त्याची ते पाहणी करतील, त्याचे एक प्रेझेंटेशन त्यांना द्यायचे आहे. आमच्या काही लोकांनी सुप्रियाच्या मुलीच्या लग्नात त्याचं प्रेझेंटेशन त्यांना दिलं होते. पण त्यांना हे सविस्तर समजून घ्यायचे आहे, तो कार्यक्रम येथे आहे, असे पवारांनी सांगितले
शिवसेनेच्या संघर्षावर काय होईल, हे मी आत्ताच सांगू शकत नाही. शेवटी न्यायालयाने निकाल द्यायचा आहे. अजून सुनावण्या सुरू आहेत. एका बाजूचा युक्तिवाद संपला आहे. त्याआधी आपण भाष्य करणे उचित ठरणार नाही. आठ दहा दिवस वाट पाहू आणि मग चर्चा करू, असे पवार म्हणाले.


