राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा आज (११ जून) मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केलं. मात्र, भाषणाला सुरूवात करताच सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या आठवणीने भावुक झाल्या. ‘आज अजित पवार आपल्यात नाहीत’, असं म्हणत सुनेत्रा पवार यांना भाषणादरम्यान गहिवरून आलं.“आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा २७ वा वर्धापन दिन साजरा करत असताना एक वेगळ्या भावना आणि भावनिक वातावरणात आहोत. आपल्या सगळ्यांचे नेते अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन आहे”, असं म्हणत सुनेत्रा पवार भाषणादरम्यान भावुक झाल्या.
“यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपल्याला सर्वांनाच लाभलेला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष पुढील वाटचाल करत आहे. अजित पवार यांना जो महाराष्ट्र अपेक्षित होता, तसा महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा मला विश्वास आहे”, असंही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या आहेत.
“शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची राष्ट्रवादीची विचारधारा पुढे घेऊन जाणं याचाच अर्थ सर्वांना बरोबर घेऊन जाणं आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, येथील प्रत्येक तळागाळातील प्रत्येक घटकांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे”, असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.
“आजच्या आपल्या वर्धापन दिनाची जी थीम ठरवली होती, ती थीम म्हणजे समर्पन, संघर्ष आणि संकल्प. ही संकल्पना आणि यंदाचा वर्धापन दिन अजितदादांना समर्पित केलेला आहे. अजित पवारांनी पक्षाच्या बळकटीसाठी गेले अनेक वर्ष पूर्णपणे स्वत:ला समर्पित केलं होतं. त्यामुळे आपण सुरुवातीलाच अजितदादांसाठी ही समर्पनाची भूमिका घेतली आहे”, असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.


