यवतमाळ : आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका निष्पाप गृहिणीचा बळी गेला आहे. केवळ ‘मटण नीट शिजले नाही’ या शुल्लक कारणावरून झालेल्या वादाने एका हसत्याखेळत्या संसाराची राखरांगोळी झाली. घरी जेवायला आलेल्या मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न झाल्याने पत्नीने विष प्राशन करून जीवन संपवलं. चेतना मनोज जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
चेतनाचा पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. ‘मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर,’ अशी सूचना त्याने पत्नीला दिली होती. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता, पण पाहुण्यासमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला.मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही 2015 मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. 2017 मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र, बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की, तिने टोकाचे पाऊल उचलले. भरल्या ताटावरून उठून ती आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन जेव्हा तिने पतीला ही बाब सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली.
ही घटना घडल्यानंतर चेतनाला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
चेतनाचे मामा मनोहर राठोड, रा. देवगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेली गर्दी आणि त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता. आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले असून, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


