‘स्मार्ट मीटरची सक्ती खपवून घेणार नाही; महावितरण विरोधात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

महावितरण विरोधात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

‘स्मार्ट मीटरची सक्ती खपवून घेणार नाही; वाढीव वीजबिले रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन’

अहिल्यानगर : प्रतिनिधी

महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात तसेच शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर येथे शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. वाढीव वीजबिले, अघोषित भारनियमन, स्मार्ट मीटरची सक्ती, ट्रान्सफॉर्मर बदलण्यास होणारा विलंब, सोलर योजनेतील गैरप्रकार आणि अधिकाऱ्यांच्या अरेरावीविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महावितरण प्रशासनाला निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, राज्य सरकार एका बाजूला स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे सांगत असताना दुसऱ्या बाजूला शहर व ग्रामीण भागात नागरिकांवर दबाव टाकून स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. हा प्रकार तातडीने थांबवावा. जिल्ह्यात कुठेही जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तीव्र आंदोलन उभारण्यासह जेलमध्ये जाण्याचीही तयारी असल्याचा इशारा त्यांनी दिला.

महावितरणच्या अधीक्षक अभियंता विजयकुमार पवार यांना निवेदन देताना खासदार लंके यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही अधिकारी व कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून, तक्रारदारांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सिंगल फेज योजना नसलेल्या गावांना तातडीने वीजपुरवठा द्यावा आणि प्रलंबित तक्रारी निश्चित कालमर्यादेत निकाली काढाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे श्रीगोंदा तालुका व नगर शहरात निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याचा उल्लेख करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शेवगाव तालुक्यात बांबूच्या आधारावर वीजतारा ओढण्यात आल्याचे प्रकार तसेच नगर शहरातील अनेक भागांमध्ये उघड्या अवस्थेतील डीपीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा मुद्दा उपस्थित करत पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी वाढीव वीजबिले कमी करणे, ग्रामीण भागातील अघोषित भारनियमन बंद करणे, जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलणे, नुकसानग्रस्त पोल व वीजतारा दुरुस्त करणे, डीपीअभावी पिकांचे होणारे नुकसान टाळणे, महावितरणचे साहित्य उपलब्ध करून देणे, सोलर योजनेतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या एजन्सींवर कारवाई करणे आणि अंदाजे रीडिंगऐवजी प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्याची व्यवस्था सुरू करणे, अशा विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.

महावितरण प्रशासनाने पुढील पंधरा दिवसांत सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत. अन्यथा जिल्हाभर अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा खासदार लंके यांनी दिला.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रा. सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, माजी नगरसेवक दीप चव्हाण, नगरसेवक योगीराज गाडे, गोविंद मोकाटे, रेवजी नांगरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles