हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपी वसीम शेखविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर हायवे रोडवरील एका हॉटेलमध्ये २० वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वसीम गफुर शेख (रा. पाईपलाईन हाडको, आंबेडकर चौक, सावेडी, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकाच कॉलनीत राहणारे आहेत. आरोपी वसीम याने रविवारी, १४ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तरुणीला संभाजीनगर हायवेवरील हॉटेल चंद्रकांत येथील एका खोलीत नेले. तेथे तिची बदनामी करण्याची आणि तिला जिवे मारण्याची धमकी देऊन, तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तरुणीला आणि तिच्या घरच्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
………………………………………
हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; सासरच्या पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर: घर खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून एका २९ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि नणंदेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा आणि नियमांनुसार पीडित महिला व तिच्या माहेरच्या लोकांची नावे सुरक्षिततेसाठी गोपनीय ठेवण्यात आली आहेत.
पीडित महिलेचा विवाह २०१५ मध्ये आष्टी तालुक्यातील पिपळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर सासरच्या लोकांनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. घरात काम नीट येत नाही आणि स्वयंपाक व्यवस्थित करत नाही, असे म्हणून तिला टोमणे मारण्यात येत होते. तसेच २०१६ मध्ये पहिली मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने तिला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करून घराबाहेर काढले होते.
त्यानंतर कौटुंबिक न्यायालयात धाव घेतल्यानंतर पतीने पुन्हा नांदवण्याचे आश्वासन दिले आणि तो तिला मुंबई येथे घेऊन गेला. मात्र, तेथेही काही दिवसांनंतर घर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. विवाहितेने गरिबीमुळे नकार दिला असता, तिला उपाशी ठेवून आणि घरात कोंडून ठेवून अमानुष छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


