अहिल्यानगर : राज्याच्या मंत्रिमंडळाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे बैठक होणार आहे. ही बैठक दि. २९ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीचे त्रिशताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका साधारणपणे मुंबईत होतात. नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथेही प्रसंगानिमित्त बैठका आयोजित केल्या गेल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात होणारी ही पहिलीच बैठक असणार आहे. बैठक होण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आग्रही होते.
बैठक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आज, बुधवारी चौंडी येथे भेट देऊन पाहणी केली तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक होण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्या तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे होणार असल्याची तारीख राज्य सरकारकडून अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २९ एप्रिलला ही बैठक होणार आहे. मंत्रिमंडळासाठी उपस्थित राहणारे वरिष्ठ अधिकारी अहिल्यानगर शहरात थांबून नंतर चौंडी येथे जातील, असे प्राथमिक नियोजन आहे. मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात धांदल उडाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी आहे त्यापूर्वी ही बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चौंडी विकास आराखड्यासंदर्भात सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत आज बैठक आयोजित करण्यात आली होती. आराखड्यावर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना सभापती शिंदे यांनी केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौंडी विकास आराखड्यासाठी निधी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी आदेशीत केले.
या बैठकीत मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना चौंडी येथे होणाऱ्या प्रस्तावित मंत्रीमंडळ बैठक आयोजनासंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. अशा प्रकारे ग्रामीण ठिकाणी होणारी ही राज्य मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक आहे. श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, असेही यावेळी निश्चित करण्यात आले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत स्थापत्य विशारद श्री.किरण कलमदानी यांनी सादरीकरण केले.


