गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. 2019 साली शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती, मात्र 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदेंनी भाजपला सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर अजित पवारांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला होती. त्यानंतर महायुतीने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवला होता. मात्र आता आगामी काळात महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या काही नेत्यांनी आगामी काळात स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, ’29 मध्ये भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र लढू शकते. आपण शिवसेना भाजप युती तुटताना पाहिलेलं आहे. कधीही कुणाचेही कोणतेही शाश्वत राजकारण नसते. अनेक युती अशा झाल्या की, कधी स्वप्नातही त्या होऊ शकल्या नसत्या. आपला पक्ष मजबूत करणे हा सर्वात मोठा उपाय आहे. आमची भूमिका महायुती सोबत लढायची आहे, ताकद विभागाला नको.’यानंतर मंत्री उदय सामंत यांनीही सकारात्मक विधान केले होते. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मित्रपक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. संजय शिरसाट पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने बोलले त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं विधान केले होते. त्यामुळे शिवसेना भाजप वेगळे होणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेना भाजप 2029 साली वेगवेगळे लढणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री यांनी, ‘मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदे यांना आहे. त्यांनी याबाबत एखादं विधान केलं तर मला तुम्ही त्यावर विचारा, इतर लोक बोलले तर त्याबद्दल आमच्या प्रवक्त्यांना विचारा’ असं म्हणत या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला आहे.
2029 ला शिवसेना-भाजप वेगवेगळी लढणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले…..
- Advertisement -


