अशोक खरात खटल्यात ॲड. परिमल फळे सरकारतर्फे बाजू मांडणार; उज्ज्वल निकम यांना करणार साहाय्य

अशोक खरात खटल्यात ॲड. परिमल फळे
सरकारतर्फे बाजू मांडणार

विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांना करणार साहाय्य

राज्य सरकारची अधिसूचना जारी

अहिल्यानगर : प्रतिनिधी

राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील न्यायालयीन खटल्यांमध्ये सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यानगर येथील नामवंत फौजदारी वकील ॲड. परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी (दि. ११ जून) जारी केली.

या बहुचर्चित प्रकरणात राज्य सरकारने यापूर्वीच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. आता त्यांच्या साहाय्यासाठी ॲड. परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने या खटल्याच्या सुनावणीकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारच्या वतीने विधी व न्याय विभागाचे कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यानुसार अशोक खरात याच्याविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. परिमल फळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ॲड. परिमल फळे हे फौजदारी कायद्यातील अनुभवी वकील म्हणून ओळखले जातात. यापूर्वी राज्यभर गाजलेल्या राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य हत्या प्रकरण तसेच नेवासे येथील ॲड. रियाज पठाण हत्या प्रकरणातही सरकारतर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासमवेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही संवेदनशील आणि चर्चित खटल्यांमध्ये निकम व फळे हे विधीज्ञ सरकारची बाजू प्रभावीपणे मांडत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध गाजलेल्या खटल्यांमधील त्यांच्या कामामुळे ॲड. परिमल फळे यांनी न्यायालयीन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बहुचर्चित रेखा जरे खून, निघोज, ता. पारनेर येथील संदीप वारळ हत्या प्रकरणासह, निघोज ता. पारनेर येथील सुनील पवार खटल्यात आरोपी प्रवीण रसाळ यांच्या बाजूने तसेच अनेक महत्त्वाच्या फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी यशस्वीपणे बाजू मांडली आहे.

आता भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने पुन्हा एकदा ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. परिमल फळे या अनुभवी जोडीवर विश्वास दाखविल्याने या खटल्याच्या पुढील सुनावणी व न्यायालयीन प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles