तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली. तेव्हापासून या विभागाकडून कारवाईची धडक मोहीम राज्यभरात सुरू आहे. भेसळ करणाऱ्यांवर दररोज कठोर कारवाई केली जात असून, करोडो रुपयांचा माल जप्त केला जात आहे. यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली असून, याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा दिला आहे.

सनदी अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे त्यांना वारंवार बदलीला सामोरे जावे लागते. याचबरोबर सरकारकडून अनेक वेळा त्यांना अडगळीच्या विभागांमध्ये नियुक्ती दिली जाते. त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार दिल्यापासून हा विभाग खडबडून जागा झाला आहे. वर्षभरात बोटावर मोजता येतील एवढ्याच कारवाया करणारा हा विभाग आता दररोज धडक कारवाया करू लागला आहे. याआधी विभागातील अधिकारी कारवाई न करण्याचे कारण म्हणून मनुष्यबळाच्या कमतरतेकडे बोट दाखवत. परंतु आता असे काय अचानक झाले आणि मनुष्यबळाच्या कमतरतेचा प्रश्न सुटण्याआधी कारवायांना वेग आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात सुरू असलेल्या कारवायांमुळे आता तुकाराम मुंढे यांची बदली होण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर म्हणाले की, मुंढे यांच्याकडून सुरू असलेली कारवाई ग्राहकांच्या हिताची आणि कल्याणाची आहे. त्यांच्या कारवाईला आमचा पाठिंबा आहे. त्यांच्या बदलीसाठी व्यापारी वर्गाकडून सरकारवर दबाव आणला जात आहे, मात्र सरकारने हा दबाव झुगारून टाकावा. मुंढे यांची बदली सरकारने करू नये, यासाठी आम्ही ग्राहकांमध्ये जनजागृती करणार आहोत. यासाठी व्यापक स्वाक्षरी मोहीम राबवणार आहोत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिणार आहोत. याप्रकरणी मुंढे यांची आज आम्ही मंत्रालयात भेट घेणार आहोत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles