अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीकपात लागू होणार ! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा आदेश

धरण व कालव्यांच्या क्षेत्रातील अनधिकृत पाणीउपसा थांबवण्यासाठी वीजपुरवठा खंडित करावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. महापालिका, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घ्यावा, असेही आदेश त्यांनी दिले.

एल निनोचा संभाव्य प्रभाव, पाणीसाठा आरक्षण व कृषी विभागाच्या उपाययोजनांच्या तातडीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी विविध निर्देश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जलसंपदा विभागाचे अध्यक्ष अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, नगरपालिका प्रशासनाधिकारी डॉ. प्रदीप पठारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बढदे, नायब तहसीलदार भारती घोरपडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतीसाठीचे पाणी आवर्तन तात्काळ बंद करावे, जलसंपदा विभागाने पाणीचोरी रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त करावीत, कालवे व बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत उपसा त्वरित बंद करावा, त्यासाठी विद्युत वितरण केंद्रे बंद करून वीज पुरवठा खंडित करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. महापालिका, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याची नियोजन करावे, स्थानिक परिस्थितीनुसार नागरिकांना दैनंदिन किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा, जलसंपदा विभागाने पाणीसाठ्याची स्थिती तपासून पाण्याचा योग्य वापरासाठी सविस्तर नियोजन आराखडा तातडीने सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे, जमिनीत पुरेशी ओल व समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये याची जनजागृती करावी, उतारावर आडवी पेरणी करण्याची जनजागृती करावी, खतांचा काळाबाजार, लिंकिंग होणार नाही यासाठी तपासणी करावी, डिजिटल पीक पाहणी मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशाही सूचना देण्यात आल्या.कालव्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यास अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अधिक फायदेशीर की पाणी बचतीचे ठरत असेल तर त्याची पर्यायी तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आशिया यांनी बैठकीत दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles