चिंता वाढली………. पुढील ५ दिवस पाऊस नाही, हवामान खात्याने दिला महत्वाचा सल्ला

महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले तरी देखील अद्याप संपूर्ण राज्य पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस सुरू आहे. पण उर्वरीत जिल्ह्ये अजूनही मान्सूनची वाट पाहत आहेत. अशामध्ये हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची अपडेट देत शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. पुढचे ५ दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवाव्यात असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यात मान्सूनच्या विलंबामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ५ दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अल निनो आणि आयओडी (Indian Ocean Dipole) यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यास आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे हवामान विभागप्रमुख एस. डी. सानप यांनी मान्सूनबाबत महत्वाची अपडेट देताना सांगितले की, ‘मान्सून लांबला आहे. पुढील ५ दिवस पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवाव्यात. मान्सून सर्वदूर पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. तळ कोकणात तसेच कोल्हापूर, सांगलीच्या काही भागात मान्सून एकाच ठिकाणी आहे.’

दरम्यान, हवामान खात्याने असे देखील सांगितले की, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या भागांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचे चटके देखील लागण्याची शक्यता आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस देखील पडू शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles