बोगस आधार, बनावट शाळा सोडल्याचा दाखला; नगर जिल्ह्यात लग्नाच्या नावाने फसवणूक ,खंडणी मागणाऱ्या 3 महिलांना अटक

विवाहासाठी मुलगी शोधत असलेल्या एका तरुणाची लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा तसेच खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार राहाता तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन महिलांना अटक केली असून नागरिकांनी विवाह जुळविताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरातील 30 वर्षीय शेतकरी युवक विवाहासाठी मुलगी शोधत होता. याच दरम्यान त्याचा संपर्क मध्यस्थामार्फत रेश्मा केशव काटे (रा. नन्हे, ता आंबेगाव, जि. पुणे) हिच्याशी झाला. तिने विवाहासाठी मुली उपलब्ध असल्याचे सांगत राहाता तालुक्यातील साकुरी शिवार येथील मंगल अंकुश पठारे हिच्याकडे मुलगी असल्याचे सांगून संबंधित तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नासाठी मुलगी दाखविण्याच्या बहाण्याने आरोपींनी सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने 12 हजार 500 रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, 19 जून 2026 रोजी तक्रारदार, त्याचा भाऊ आणि मित्र यांना साकुरी शिवार येथील गोदावरी वसाहतीत बोलावण्यात आले. तेथे सुगंधा कैलास गायकवाड हिला विवाहासाठी मुलगी म्हणून दाखविण्यात आले. मुलीच्या कुटुंबाबाबत चौकशी केली असता तिच्या पालकांविषयी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. यानंतर तक्रारदाराने कायदेशीर पद्धतीने कोर्ट मॅरेज करण्याची मागणी केली. मात्र, आरोपी महिलांनी घरगुती पद्धतीने लग्न लावून देण्याचा आग्रह धरत त्यासाठी तब्बल 2 लाख 30 हजार रुपयांची मागणी केली. तसेच मुलीला तत्काळ सोबत घेऊन जाण्याचा दबाव टाकला. या प्रकाराबाबत संशय आल्याने तक्रारदाराच्या मित्रांनी बाहेर पडून परिस्थितीचा अंदाज घेतला.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराने कोर्ट मॅरेजचा आग्रह कायम ठेवल्यानंतर आरोपी महिलांनी त्याला आणि त्याच्या मित्राला घरात डांबून ठेवले. तसेच बाहेर गेलेल्या नातेवाईक व मित्रांना फोन करून, 2 लाख 30 हजार रुपयांची रक्कम दिल्यासच तुमच्या लोकांची सुटका करू, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच तक्रारदाराच्या नातेवाईकांनी राहाता पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तक्रारदार व त्याच्या मित्राची सुटका केली. त्यानंतर राहाता पोलीस ठाण्यात तिन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी रेश्मा केशव काटे, मंगल अंकुश पठारे आणि सुगंधा कैलास गायकवाड (रा. साकुरी शिवार, ता. राहाता) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4), 308(2), 126(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात तिन्ही महिलांनी संगनमताने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, आरोपी मंगल अंकुश पठारे हिच्याविरुद्ध यापूर्वीही फसवणूक व इतर स्वरूपाचे गुन्हे राहाता पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

नमूद गुन्ह्यातील महिला आरोपींनी यापूर्वीही अवैध आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने अनेक पुरुषांना लग्नाच्या बहाण्याने फसविले असण्याची दाट शक्यता आहे. लग्नासाठी दाखविण्यात आलेली मुलगी सुनंदा गायकवाड हिच्या नावाने बोगस आधार कार्ड तसेच बोगस शाळा सोडल्याचा दाखला तयार करण्यात आला असण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पोलीसांकडून सखोल तपास सुरू आहे. या महिला गुन्हेगारांच्या टोळीने लग्नाच्या बहाण्याने अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास, संबंधित तक्रारदारांनी पुढे येऊन राहाता पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles