अहिल्यानगर, 4 जून 2026:अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीच्यावेळी मोठा गोंधळ. अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी आपण माघार घेतली नसून आपली खोटी सही करून माघारीचा अर्ज दिल्याचा आरोप केला आहे. फसवणूक झाल्याने आत्महत्या करण्याचा इशाराही दिला आहे.
महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधातील करण ससाणे यांच्यासह सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे महायुतीकडून सांगण्यात येत असताना दुपारी 3 वाजता पानसरे जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि हा दावा केला.
आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष.
मनधरणीनंतर अपक्षांची माघार
अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघारीचे कारण स्पष्ट करताना सांगितले, “नगरसेवकांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. नगरसेवकांशी चर्चा करून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली नव्हती. स्थानिक पातळीवर अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.” मच्छिंद्र धुमाळ व कमलेश गांधी यांनीही अर्ज मागे घेतले.
पानसरे यांचा खोट्या सहीचा आरोप
दरम्यान, श्रीगोंद्याचे अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “खोटी सही करून माझा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आला आहे. अर्ज कायम न ठेवल्यास आत्महत्या करेन,” अशी धमकी त्यांनी दिली. या आरोपामुळे निवडणुकीला नवा ट्विस्ट मिळाला आहे.


