अहिल्यानग-मैत्रीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून लग्नासाठी दागिने हवे असल्याचे खोटे कारण सांगत दोन महिलांकडून सोन्याचे दागिने घेऊन अपहार करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 15 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनिता गणेश नजन (रा. गणेश पार्क कॉलनी, गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) हिने नागापूर येथील वनिता परसराम नवले व बोल्हेगाव येथील अंजुम रफिक तांबोळी यांच्याशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर लग्न समारंभासाठी दागिने घालण्याची गरज असल्याचे सांगून तिने वनिता नवले यांच्याकडील साडेतीन तोळे आणि अंजुम तांबोळी यांच्याकडील अडीच तोळे सोन्याचे दागिने घेतले. मात्र, दागिने परत न करता त्यांचा अपहार करून ती पसार झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 24 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले होते.
पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तपासणी आणि विविध माहिती स्रोतांचा वापर करून व्यापक शोधमोहीम राबविली. तपासादरम्यान या गुन्ह्यात अनिता गणेश नजन (40), वैष्णवी गणेश नजन (22), गणेश परसराम नजन (48, तिघे रा. गणेश पार्क कॉलनी, गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) आणि त्यांचा साथीदार बन्यामीन योसेफ बोरूडे (26, रा. कर्जुने खारे, ता. अहिल्यानगर) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी विविध मोबाईल फोन व सिमकार्डचा वापर करून पोलिसांची दिशाभूल करत परागंदा झाले होते. मात्र, तपास पथकाने अहोरात्र मेहनत घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला आणि त्यांना अटक केली. अटकेनंतर त्यांच्याकडून 8 लाख 40 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 75 हजार रूपये किमतीचे विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन व सिमकार्ड जप्त करण्यात आले.


