राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले आहे, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहेदेवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, जवळपास 25 ते 30 वर्ष त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे, पण असं पहिल्यांदा घडतंय, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्यांचे निकाल पुढे चाललेले आहेत, मला असं वाटतं की एकूणच ही जी काही पद्धती आहे ही पद्धत फार योग्य वाटत नाही, अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सर्वांना मान्य करावे लागेल, निवडणूक आयोग देखील स्वायत्त आहे, पण यातून जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांचा एक प्रकारे भ्रमनिरास झालेला आहे, आणि सिस्टीमच्या फेल्युअरमुळे त्यांची काही चूक नसताना अशा पद्धतीने काही गोष्टी होण्या योग्य नाहीत, मला वाटतं अजून फार निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत, या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुका मध्ये असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे, असेही पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


