अहिल्यानगर-प्रेमाच्या आमिषाने एका युवतीचा विश्वासघात करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून गरोदर राहिल्यानंतर लग्नास नकार देत तिला सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने यशोधरानगर (जि. नागपूर) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सदरचा गुन्हा तपासकामी तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे.संतोष देवराव गादे (वय 42 रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. फिर्यादी सध्या नागपूर येथे राहत असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिची छत्रपती संभाजीनगर येथे संतोष गादे सोबत ओळख झाली होती. पुढे ही ओळख प्रेमात बदलली. संतोषने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर लग्नास नकार दिल्याने तिने त्याच्याविरूध्द पुंडलीकनगर (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर संतोष नागपूरला गेला व पीडितेला पुन्हा लग्नाचे आश्वासन देऊन अहिल्यानगरला घेऊन आला. पीडितेला सावेडीत एका ठिकाणी रूममध्ये ठेवून त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यावेळी पीडिता गरोदर राहिली असून तिने लग्नाची मागणी करताच संतोषने तिच्यावर पुन्हा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. पीडितेने पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचा दबाव टाकत नकार दिल्यास तिला व तिच्या गर्भस्थ बाळाला मारण्याची धमकी दिली. सर्वप्रकारानंतर 22 जून 2025 रोजी संतोष गादे याने पीडितेला नागपूरमध्ये सोडून पळ काढला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.


