नवी दिल्ली : ‘मला दिल्लीत पाठवावे, असे अनेकांना वाटते. मात्र त्या सगळ्यांना मी सांगतो की, मी मुंबईतच आहे’, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रात येण्याची शक्यता पुन्हा एकदा फेटाळून लावली. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांचा नवा संघटनात्मक चमू जाहीर झाला, त्याच दिवशी फडणवीस यांचा दिल्ली दौरा झाला, शिवाय, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या दिल्लीवारीबद्दल राजकीय चर्चा रंगली होती.
‘मी महाराष्ट्रात आहे. जनतेने आणि नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे,’ असे सांगत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. ‘मी दिल्लीत असलो तरी चर्चा होते आणि मुंबईत असलो तरी चर्चा होते. अनेक रिकामटेकड्या लोकांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडते. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या,’ अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही फडणवीस यांच्या दिल्ली दौर्यावरून राजकीय चर्चेला सुरुवात केली होती. त्यावर फडणवीस यांनी, ज्याला जे तारे तोडायचे आहेत, जे फुगे उडवायचे आहेत, जी पतंग उडवायची आहे ती उडवू द्या,’ असे नमूद केले.
राज्यातील विविध विकासप्रकल्पांसाठी केंद्राची मदत मिळावी यासाठी दिल्ली दौर्यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, उत्तन-विरार कॉरिडॉर, नदीजोड प्रकल्प यांसह केंद्राच्या मदतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्राकडून आवश्यक ती मदत मिळवून प्रकल्पांना गती देण्याचा या भेटीमागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


