मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते माजी खासदार आणि आमदार भाई केशवराव धोंडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम भाऊ धोंडगे हे मातोश्रीवर आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना उबाठा पक्षात आज पक्षप्रवेश झाला. यावेळी, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, विनायक राऊत, माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची उपस्थिती होती. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी मुंबईसह नांदेडमधील पाऊस आणि पूरस्थितीवर भाष्य केलं असून यास सरकार जबाबदार असल्याचे म्हटले. तसेच, मुंबईतील पावसावर भाष्य करताना हवामान वेधशाळेलाही टोला लगावला. दरम्यान, केवशराव धोंडगे हे नांदेड जिल्ह्यातून 5 वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. धोंडगे 1957 मध्ये पहिल्यांदा द्वैभाषिक महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1962, 1972, 1985 आणि 1990 मध्ये ते विधानसभेचे आमदार बनले होते.
राजकारणामध्ये सध्या जो काही धुमाकूळ घातला जातोय, इथं माणूसच दिसेना झाला आहे. सगळे चोर दिसत आहेत, कोणी पैसे चोरतंय, कुणी मत चोरतय, कुणी पक्ष चोरतय असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला. या सगळ्या चोर बाजारामध्ये माणसं दिसेनाशी झाली आहेत. राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला असतानाही तुम्ही सर्वजण इथं आला आहात, त्यातून तुमची जिद्द दिसते. मी सोशल मीडियावर बघितलं, मुंबईत भगवं वादळ येत आहे. पण, हे जे नैसर्गिक वादळ आलं त्याचं काय?. मुंबईमध्ये तुम्ही बघताय नवीन नवीन ठिकाणी पाणी तुंबत आहे. विमानतळावरील पाण्याचे फोटो येत आहेत. आता हे विमानतळ कोणाकडे आहे? त्यामुळे आता बंदर करायची गरज नाही. जहाज पण तिथेच येतील आणि विमान पण तिथे येतील, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अदानींवरही निशाणा साधला.
तुम्ही आज इकडे आलाय, पण आता जाताना व्यवस्थित जावा. कारण, पावसाने धुमाकूळ घातला आहे, वादळही आहे आणि बऱ्यात दिवसांनी वेधशाळेचा अंदाज खरा ठरला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसमोरच वेधशाळेलाही टोमणा लगावला. वेधशाळेने कालच सूचना दिल्या आणि त्यानुसार आज पाऊस सुरू असून मुंबईत आणि इतरही ठिकाणी शाळा, कार्यालये बंद आहेत. तुम्ही तिकडे पोहोचल्यानंतर त्या 11 गावांमध्ये जी आपत्ती आली आहे, जी नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. त्या गावकऱ्यांचे तिथे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असतं तर कोणाला जीव गमवायची वेळ आली नसती, असेही ठाकरेंनी म्हटले.


