अहिल्यानगर -जिल्हा प्रशासनात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. जनगणनेमध्ये जबाबदारी असलेल्या कर्मचार्यांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे 159 कर्मचारीच बदलीस पात्र ठरत आहेत. प्रशासकीय, विनंती बदल्या दरवर्षी केल्या जातात. यावर्षी जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील कर्मचार्यांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.महसूल सहायक पदावरील 60, अव्वल कारकून 54, तलाठी 10 तर मंडलाधिकारी 35 बदलीस पात्र ठरत आहेत. जे कर्मचारी बदलीस पात्र आहेत. त्यांना विकल्प मागविण्यात आले आहेत. सर्व बदल्या या पारदर्शी आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. दिव्यांग कर्मचार्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. शासकीय कर्मचार्यांचे पाल्य गंभीर आजारी असणार्या दुसर्या क्रमांकावर, त्यानंतर कर्मचारी स्वतः गंभीर आजारी असल्यास त्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
विधवा-परितक्त्या चौथ्या क्रमांकावर, पती-पत्नी एकत्रिकरण, शासकीय कर्मचार्यांच्या पाल्यांची शस्त्रक्रिया असणारे सहाव्या तर माजी सैनिक सातव्या क्रमांकावर आहेत. प्रत्येक वर्गवारीला कर्मचार्यांना उपलब्ध जागा ऑनलाईन पद्धतीने दाखविल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यांने बदलीचे ठिकाण निवडल्यावर पुढील वर्गवारीतील कर्मचार्याला संधी दिली जाणार आहे. या बदल्या या महिनाअखेर होण्याची शक्यता आहे.


