ग्रामपंचायत निवडणुका आल्या की एक प्रश्न हमखास विचारला जातो. या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर का घेतल्या जात नाहीत? राज्यातील विधानसभा, लोकसभा, महापालिका किंवा नगरपरिषद निवडणुका पक्षचिन्हावर होत असताना ग्रामपंचायतींसाठी वेगळी पद्धत का आहे? असं विचारलं जाते. यामागे कायदेशीर आणि प्रशासकीय कारणे आहेत. तेच आपण जाणून घेणार आहोत.महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ अंतर्गत घेतल्या जातात. या कायद्यानुसार ग्रामपंचायत निवडणुका पक्षनिरपेक्ष पद्धतीने घेण्याची तरतूद आहे. म्हणजेच, उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचे अधिकृत चिन्ह वापरू शकत नाहीत आणि त्यांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागते.
याउलट, विधानसभा, लोकसभा किंवा महापालिका निवडणुका या राजकीय पक्षांच्या थेट सहभागासह आणि त्यांच्या चिन्हांवर घेतल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांची रचना वेगळी ठेवण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर का लढवली जात नाही?
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य व्यवस्थेची सर्वात खालची पातळी आहे. गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे ही तिची प्रमुख जबाबदारी असते.
यासाठी निवडणुका पक्षीय राजकारणापासून दूर ठेवण्याचा उद्देश आहे. जर पक्षीय राजकारण थेट ग्रामपातळीवर आले, तर विकासाच्या मुद्द्यांपेक्षा राजकीय वाद आणि गटबाजी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कायद्यानेच या निवडणुका अपक्ष स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत.जरी कायद्यानुसार ग्रामपंचायत निवडणुका पक्षनिरपेक्ष असल्या तरी प्रत्यक्षात अनेक उमेदवारांना राजकीय पक्षांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असतो. गावपातळीवर गट-तट निर्माण होतात आणि निवडणुकीत पक्षीय प्रभाव दिसून येतो. अधिकृतरीत्या कोणत्याही उमेदवाराला पक्षाचे चिन्ह दिले जात नाही आणि निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार सर्व उमेदवार अपक्ष म्हणूनच लढतात.न्यायालयांनीही ग्रामपंचायत निवडणुका पक्षनिरपेक्ष ठेवण्याच्या भूमिकेला मान्यता दिली आहे. न्यायालयांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींनी राजकीय विचारांपेक्षा गावाच्या विकासाला प्राधान्य द्यावे. यामुळे प्रशासन अधिक प्रभावी राहते आणि निर्णय प्रक्रिया स्थानिक गरजांवर आधारित होते.
- Advertisement -


