ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहण्याच्या तक्रारी आता कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांची GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून हजेरी घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मंगळवारी लेखी आदेश देण्यात आला.या निर्णयामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात आणि गावात उपस्थित राहावे लागणार आहे. GPS आणि बायोमेट्रिक हजेरीच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार असल्याने ग्रामसेवकांच्या कामकाजावर प्रशासनाची अधिक प्रभावी नजर राहणार आहे.
ग्रामीण भागात ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाचा घटक आहे. ग्रामस्थांना विविध शासकीय योजना, दाखले, प्रमाणपत्रे आणि ग्रामपंचायतीशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर असते.
मात्र, ग्रामसेवक कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहत असल्याच्या अनेक तक्रारी आणि घटना समोर आल्या आहेत. ग्रामसेवक कार्यालयात उपलब्ध नसल्याने दाखले, प्रमाणपत्रे तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. परिणामी अनेक ग्रामस्थांची कामे प्रलंबित राहतात.
आता GPS आणि बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमुळे अशा प्रकारच्या अनधिकृत गैरहजेरीला लगाम लागण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी नेमक्या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही, याची पडताळणी GPSच्या माध्यमातून करता येणार आहे. तर बायोमेट्रिक प्रणालीमुळे प्रत्यक्ष उपस्थितीची डिजिटल नोंद उपलब्ध होणार आहे.
ग्रामसेवकांची उपस्थिती निश्चित झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे आणि विविध योजनांशी संबंधित कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
GPSमुळे ग्रामसेवक नेमक्या कार्यक्षेत्रात आहेत की नाही, तर बायोमेट्रिकमुळे ते प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित आहेत की नाही, याची डिजिटल नोंद राहणार आहे. त्यामुळे ग्रामसेवकांच्या मनमानी अनुपस्थितीला आळा बसून ग्रामस्थांची प्रलंबित कामे वेळेत मार्गी लागण्याची शक्यता आहे.
एकूणच, ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर आता ‘डिजिटल वॉच’ राहणार असून, गावकऱ्यांच्या कामांना होणाऱ्या विलंबावरही यामुळे लगाम लागण्याची अपेक्षा आहे.


