ई-पीक पाहणीचं नवीन अपडेट अॅप सरकारकडून लॉन्च करण्यात आलंय.शेतकऱ्यांना आता या नवीन अॅपद्वारे पिकाची ई-पीक पाहणी करावी लागणार आहे. त्यासाठीची नेमकी तारीख काय आहे? आणि ई-पीक पाहणी नेमकी कशी करायची? याची माहिती आपण जाणून घेऊयात..
-1 ऑगस्टपासून सुरू झालेली ही मोहीम 14 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, यानंतर नोंदणी न केल्यास पीकविमा, अनुदान आणि इतर शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
-नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘ई-पीक पाहणी डीसीएस 4.0.0’ हे नवं अॅप डाउनलोड करा.
-अॅप उघडल्यानंतर आधार क्रमांक आणि आधाराशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
-त्यानंतर शेताचं क्षेत्रफळ, पेरणीची तारीख, बांधावरील झाडांची संख्या व प्रकार, तसेच पडीक किंवा चालू पडीत क्षेत्र याची माहिती भरा.
-या हंगामात सरकारनं नवं नियमन केलं आहे. शेताच्या सीमेजवळून 50 मीटरच्या आतून दोन स्पष्ट फोटो काढून अॅपवर अपलोड करणं बंधनकारक आहे.
-यामुळे प्रशासनाला पिकांची अचूक पडताळणी करता येईल. काही चूक झाली तरी काळजी करू नका, 48 तासांच्या आत अॅपवरच दुरुस्ती करता येते.-नव्या व्हर्जनमध्ये जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग, 50 मीटर फोटो व्हेरिफिकेशन आणि ऑफलाइन मोड अशा सुविधा दिल्या आहेत.
-ज्यांना अॅप वापरणं कठीण वाटतं, त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सहायक नेमले जाणार आहेत. हे सहायक शेतकऱ्यांना अॅप कसं वापरायचं, माहिती कशी भरायची आणि फोटो कसे अपलोड करायचे हे प्रत्यक्ष दाखवून मदत करतील.
-ई-पीक पाहणीमुळे कृषी विभागाला संपूर्ण राज्यातील पिकांची अचूक आणि अद्ययावत माहिती मिळते. याच माहितीच्या आधारावर पीकविमा हप्ता, अनुदान वाटप आणि इतर सरकारी योजना ठरतात. म्हणून वेळेत नोंदणी करणं म्हणजे केवळ कागदपत्रं पूर्ण करणं नाही, तर आपल्या हक्काच्या योजनांचं संरक्षण करणं आहे


