राज्यात मागील काही दिवसांपासून ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होता. कधी उन्हाची तीव्रता वाढत होती, तर कधी अचानक सरी कोसळून वातावरण गार होत होते. मात्र आता पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती अनुकूल झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह, ठाणे, पालघर शहरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे तब्बल २३१ मिलिमीटर पाऊस झाला, तर चिपळूण येथे २२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ही दोन्ही आकडेवारी अतिवृष्टीचे निदर्शक ठरत असून, त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या, ओढे भरून वाहू लागले आहेत. काही भागांत ग्रामीण रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत.
आज पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय कोकण, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील भंडारा येथे तब्बल ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. या विरोधाभासी परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. एका बाजूला मुसळधार पाऊस तर दुसऱ्या बाजूला उकाड्यामुळे त्रास अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव राज्यभरातील नागरिक घेत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचा आणि नद्या-ओढ्यांच्या काठावर अनावश्यक वावर टाळण्याचा सल्ला दिला आहे. एकूणच राज्यात पावसाचा जोर वाढला असून, हवामान खात्याने पुढील काही दिवस परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


