Tuesday, November 11, 2025

नगर शहरातील आनंदीबाजार तोडफोडीची घटना ;खासदार नीलेश लंके यांनी घेतली पोलिस अधिक्षकांची भेट

सखोल चौकशी करून कारवाई करा

आनंदीबाजार तोडफोडीची घटना

खासदार नीलेश लंके यांनी घेतली पोलिस अधिक्षकांची भेट

उत्सव काळात विशेष सुरक्षा देण्याचीही मागणी

अहिल्यानगर : प्रतिनिधी

रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरातील सय्यद घोडेपीर दर्ग्याच्या चौथऱ्यावर काही अज्ञात दंगेखोरांनी केलेल्या तोडफोडीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सामाजिक सलोखा व बंधुत्वाला धक्का देणारी ही घटना असल्याचे नमुद करत खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
नगर शहरात घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभुमीवर खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी पोलीस अधिक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मा. महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, अथर खान, प्रा. सीताराम काकडे, नलिनी गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
खा. लंके यांनी निवेदनात नमुद केले आहे की, सुमारे शेकडो वर्षापासून अस्तित्वात असलेले सय्यद घोडेपीर दर्गा हे धार्मिक स्थळ हे दोनही समाजांचे सामूहिक श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी झालेल्या तोडफोडीला शहरातील समाज घटकांनी दुर्देवी म्हटले असून ही कृती काही असामाजिक प्रवृत्तींचा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने काही संशयितांना ताब्यात घेले आहे, मात्र चौकशी वेगाने करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे खा. लंके यांनी स्पष्ट केले.
अलिकडेच राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची विटंबना झाली असून अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात न आल्याने अस्वस्थता वाढल्याचे लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे. अशा सलग घटनांमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या निवेदनात खा. लंके यांनी विविध मागण्या केल्या आहेत. आनंदीबाजार येथील प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणातील चौकशीला गती देऊन आरोपींना अटक करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायद्याच्या चौकटीत ठोस उपाययोजना कराव्यात, संवेदनशील भागांमध्ये पर्याप्त पोलीस बंदोबस्त ठेवून अफवांना आळा घालावा, दोन्ही समाजांत सलोखा टिकवण्यासाठी पोलिसांनी प्रतिनिधींशी संवाद व बैठकांचे आयोजन करावे.
आगामी गणेशोत्सव व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाला तातडीने नियंत्रणात आणणे आवश्यक असल्याचे खा. लंके यांनी अधोरेखित केले. खा. लंके यांनी नमूद केले आहे की, आनंदीबाजार, चितळे रोड, तेलीखूंट, मुकुंदनगरसह संवेदनशील भागांमध्ये युध्दपातळीवर पोलीस बंदोबस्त तैनात करावा, उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणांवर सतत गस्त घालावी, महिला, लहान मुले व वृध्दांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त पथके व महिला पोलीस उपस्थिती वाढवावी, अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग प्रभावीपणे राबवावे, दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींशी सतत संवाद साधून गैरसमज व अफवांना आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे.

शांततेचे आवाहन

अहिल्यानगर जिल्हा हा शांततेचा व बंधुत्वाचा आदर्श आहे. काही असामाजिक प्रवृत्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्या तरी नागरिकांनी संयम राखावा. अफवांना बळी पडू नये आणि कायद्यावर विश्वास ठेवावा. दोषींवर निश्चित कठोर कारवाई होईल.

खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles