मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून नेतेमंडळी व स्थानिक कार्यकर्तेही कामाला लागल्याचं दिसून येतं. त्यातच, दीड वर्षानंतर होणाऱ्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या (MLC) निवडणुकांची देखील रणनीती आणि मोर्चेबांधणी आत्तापासूनच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याला निमित्त ठरलं ते पावसाळी अधिवेशनादरम्यान शिक्षकांनी आझाद मैदानात केलेलं आंदोलन. या आंदोलनात शासन व शिक्षक यांच्यातील संवाददूत म्हणून भूमिका बजावणाऱ्या मंगेश चिवटे यांचं नाव शिक्षक आमदार निवडणुकीच्या शर्यतीत पुढे आहे.
पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला अद्याप दीड वर्ष बाकी आहे. मात्र, या निवडणुकीसाठी पाचही जिल्ह्यातील इच्छुकांनी आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे आहे, तर महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. मात्र, असं असलं तरी शिवसेना शिंदे गट पुणे शिक्षक मतदारसंघावर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात गत निवडणुकीत काँग्रेसचे जयंत तासगावकर यांनी अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होते. सध्याच्या घडीला तरी महाविकास आघाडीकडून जयंत आसगावकर हेच उमेदवार असतील असे चित्र आहे. पण, महायुतीकडून नेमके कोणत्या पक्षाचा उमेदवार शिक्षक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार याची चर्चा पाचही जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे.
पुणे शिक्षक मतदार संघ हा पारंपारिक पद्धतीने भाजपकडे असल्याचा दावा आहे. तर याच ठिकाणाहून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे, महायुतीत पुणे शिक्षक मतदार संघ कोणत्या पक्षाला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जयंत तासगावकर, मंगेश चिवटे यांच्यासह विजयसिंह माने आणि दत्तात्रय सावंत हे देखील शिक्षक आमदार होण्याच्या इच्छुक यादीत बसले आहेत. या सगळ्यांचीच पुणे-मुंबई-पुणे वारी सुरू झालीय. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठांनी अजून कोणालाच तयारी लागा असे आदेश दिले नाहीत.
मंगेश चिवटे हे शिवसेना शिंदे गटातील तरुण नेते असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे असलेल्या मंगेश चिवटे यांनी पत्रकारितेतून मुंबईतील करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर, शिवसेना अखंड असताना शिवसेना वैद्यकीय कक्षाची स्थापन त्यांच्या पुढाकाराने झाली. तसेच, वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं मोठं नाव असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या उभारणीची संकल्पना देखील त्यांनीच मांडली होती. सध्या ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख आहेत.


