अहिल्यानगर-दिव्यांग किंवा दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 282 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी जिल्हा रुग्णालयातून करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिले. तसे पत्रच त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय कोणत्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून काय अहवाल देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत.सध्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने या बदल्या होत आहेत. पहिल्या टप्प्यात संवर्ग 1 (दिव्यांग, दुर्धर आजार, विधवा, परितक्त्या) मधील बदल्या झाल्या. त्यात 282 शिक्षकांनी दिव्यांग किंवा दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र सादर करून संवर्ग 1 मधून बदलीचा लाभ घेतला. म्हणजे यात काहींनी बदली घेतली तर काहींनी बदलीस सोयीप्रमाणे नकार दिला. दरम्यान, राज्यात बर्याच ठिकाणी दिव्यांग किंवा दुर्धर आजाराच्या प्रमाणपत्रांमध्ये अनियमितता आढळली. अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे घेऊन लाभ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे याबाबत ग्रामविकास विभागाने 16 जून 2025 रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बदलीचा लाभ घेतलेल्या दिव्यांग कर्मचार्यांची प्रमाणपत्र पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार सीईओ आनंद भंडारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना या 282 शिक्षकांची यादी पाठवून त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2025 मधील बदली प्रक्रियेकरिता प्राथमिक शिक्षकांनी स्वतः दिव्यांगत्वाचे किंवा दुर्धर आजाराबाबत तसेच त्यांचे पाल्य, जोडीदारांचे दिव्यांगत्वाचे, दुर्धर आजाराबाबत प्रमाणपत्र सादर करून जिल्हांतर्गत बदलीकरिता संवर्ग-1 चा अर्ज सादर केलेला आहे. त्यानुसार त्यांनी बदलीचा लाभ घेतला आहे. अशा प्राथमिक शिक्षकांना अथवा त्यांचे दिव्यांग, दुर्धर आजार असलेले पाल्य किंवा जोडीदार यांना जिल्हा शल्य चिकित्सकांकडे उपस्थित राहण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी आपल्या स्तरावर मेडिकल बोर्डची स्थापन करून संबंधित शिक्षकांची दिव्यांगत्वाची किंवा दुर्धर आजाराबाबत वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांचा वैध किंवा अवैधतेबाबत निर्णय जिल्हा परिषदेस कळवावा, असे या पत्रात म्हटले आहे.


