राज्यातील शाळांसाठी नवे वेळापत्रक जाहीर, नव्या तासिकांचा समावेश……

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शाळेच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. ग्रंथालय ही नवी तासिका समाविष्ट करण्यात आली असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठीचे उपक्रम करणे शक्य होणार आहे. पूर्वीच्या तुलनेत नव्या वेळापत्रकामध्ये काही नव्या तासिकांची भर पडली असून, काही विषयांच्या तासिका कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार यंदा राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके लागू केली जाणार आहेत. त्यामुळे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी शाळांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार शाळांना शैक्षणिक कामकाजाचे नियोजन करावे लागणार आहे. विषयनिहाय तासिका विभागणी, शालेय वेळापत्रकाबाबतच्या सूचना इयत्ता तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अमलात असून, पाचवी, सातवी, आठवी या इयत्तांसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर या सूचना लागू होणार आहेत. या वेळापत्रकानुसार २३७ दिवस शालेय कामकाजाचे, तर १२८ दिवस सुट्यांचे असणार आहेत.

तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी या इयत्तांसाठीचे वेळापत्रक देण्यात आले आहे. तिसरी ते पाचवीसाठी मराठी, इंग्रजी, गणित, आपल्या सभोवतालचे विज्ञान १, आपल्या सभोवतालचे विज्ञान २, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि निरामयता, कार्यशिक्षण, तर सहावी ते आठवीसाठी मराठी, इंग्रजी, प्रचलित तिसरी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि निरामयता, कार्यशिक्षण हे विषय असणार आहेत. तर स्काऊट-गाइट ऐच्छिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शिक्षक अजय काळे म्हणाले, ग्रंथालयासाठी स्वतंत्र तासिका देण्याची कल्पना स्वागतार्ह आहे. आतापर्यंत शाळा त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवत होत्या. मात्र, आता निश्चित तासिका उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने शाळांना नियोजन करता येईल. त्यात ग्रंथालयाची ओळख, पुस्तक वाचन यांसह लेखकांशी संवाद असे उपक्रम करणे शक्य होईल.

नमुना वेळापत्रकानुसार कामकाजाचे नियोजित दिवस सदोष आहेत. सत्र परीक्षा, मूल्यांकन, अन्य उपक्रमांसाठी देण्यात आलेले १३ दिवस पुरेसे नाहीत. त्यासाठी २८ ते ३० दिवस लागतात, असे निरीक्षण माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी नोंदवले. तसेच नव्या रचनेमध्ये काही विषयांच्या तासिका कमी झाल्या आहेत. तर अतिरिक्त समृद्धीकरण कार्यक्रम, ग्रंथालय अशा नव्या तासिकांची भर पडली आहे, असे त्यांनी सांगितले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles