अकोले : अकोल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ कोटी १४ लाखांचा शासकीय पैशांचा अपहार केल्याचे वर्पे समितीच्या चौकशीत उघड झाले आहेत, अकोले पंचायत समितीत शनिवारी ४९ आरोग्य कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावत अपहार केलेल्या रक्कम दि. १८ जुलैपर्यंत जिल्हा परिषदेकडे भरण्यास नोटीसमध्ये म्हटले असुन अपहार (रक्कम) वसुलीचा भरणा न करणाऱ्यावर शिस्तभंग व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याच्या नोटीसा आरोग्य कर्मचाऱ्यांना बजावण्यात आल्याने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही महिण्यापुर्वी अपहार झाल्याच्या तक्रारीचे लेखी पत्र विभागीय आयुक्तांना एका व्यक्तीने पाठविले होते.तर विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना संबंधित पत्र पाठवले. तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी कॅफो शैलेश मोरे यांना चौकशीच्या सूचना केल्या असता कॅफोंनी या कामी पाच सदस्यांची समिती चौकशीकरिता नियुक्त केली.
या समितीत संगमनेरचे प्रदीप वर्षे हे समितीचे अध्यक्ष, तर समितीत कोपरगावचे गणेश सोनवणे, संगमनेरचे योगेश पवार, राहात्याचे जालिंदर शिंदे आणि श्रीरामपूरचे दीपक शिरतुरे हे पाच जणाच्या समितीने आवश्यक ती कागदपत्रे, दस्तावेज तपासणी करून हा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला. तर अकोले तालुक्यातील शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंदार श्रावण पावडे हे कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर शासकीय रकमांचा अपहार करणे, अनाधिकृत गैरहजर राहणे, अशा प्रकारचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गैरवर्तन केल्याने कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मवेशी आरोग्य केंद्रांतील कनिष्ठ सहायक भिमाशंकर शशिकांत देशमुख यांनी शासकीय रकमेत अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचेही जिल्हा परिषद सेवेतून निलंबन करण्यात आले होते. परंतु अकोलेतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यानी सीईओंकडे लेखी तक्रार करुन आमच्या नावे बनावट स्वाक्षरी करून बिले काढणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.
तर आरोग्य खात्यातील संपूर्ण चौकशी अहवालात ४ कोटी १४ लाखांचा शासकीय पैशांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेने अकोले पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अपहार प्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यासाठी पाठविण्यात आल्यानंतर अकोले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम शेटे यांनी अकोले पंचायत समितीत ४९ आरोग्य कर्मचाऱ्यांसह ६ वैद्यकीय अधिका-यांना नोटीसा बजावल्या आहेत.
या प्रकरणातील संशयीत आरोपी मंदार श्रावणा पावडे कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी, आणि, भीमाशंकर शशिकांत देशमुख, कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र मवेशी,व अरुण लक्ष्मण गायकवाड, कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राम्हणवाडा या तिघा मुख्य कर्मचाऱ्यांनी २०१७ पासून २०२४ पर्यंत ५३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेळावेळी ४ कोटी १४ लाख रुपयांची रक्कम पगार, ७ व्या वेतन आयोगासह अन्य कारणापोटी वर्ग केला. तसेच ५३ कर्मचाऱ्यांनी देखील जादा आलेल्या रक्कमेबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केली नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा देखील सहभाग असल्याचे जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. परिणामी अपहार प्रकरणात मुख्य तिघांसह ५३ अशा ५६ कर्मचाऱ्यांना आधी पुढील १५ दिवसात अपहार केलेल्या ४ कोटी १४ लाखांची रक्कम जिल्हा परिषदेला परत करण्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढली आहे.


