मुंबईत पार पडलेल्या विजयी महोत्सवात १९ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हातमिळवणी करत नव्या पर्वाला सुरूवात केली. मात्र, या मेळाव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची तोफ डागली. यावेळी टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. त्यांनी छत्रपती संभाजीराजेंबद्दल अपशब्द वापरले. गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यातील हाडोळती या ठिकाणी संजय गायकवाड उपस्थित होते. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. टीका करताना त्यांची जीभ घसरली, ‘खरंतर फक्त हिंदीचा विषय नाही आहे. परराज्यात गेल्यास हिंदी भाषा तुम्ही बोलणार नाहीत का? तुम्हाला जगात टिकायचं असेल तर, सगळ्याच भाषा अवगत असल्या पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज यांनी १६ भाषा शिकल्या ते मुर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ, यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काय मुर्ख होते का?’, असे अपशब्द यावेळी त्यांनी वापरले.
तसेच ‘भाषेवरून राजकारण करणं चुकीचं आहे. जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल, तर उर्दू भाषा देखील आपल्याला अवगत असायला पाहिजे ‘, असंही संजय गायकवाड यावेळी म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी राजेंवर केलेल्या विधानात वापरलेल्या अपशब्दामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूंच्या एकीवर संजय गायकवाड यांनी थेट ठाकरे ब्रँडवर टीका केली. ‘ठाकरे नावाचा ब्रँड आता राहिलेला नाही, लोकांची किती काम करतात हे महत्त्वाचं आहे. ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे असतानाच २८८ आमदार निवडून आले असते, त्यावेळी देखील ७० ते ७४ जागा निवडून आणता आल्या नाहीत’, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.


