अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरातील देणग्या आणि अर्पण केलेल्या रकमेच्या अपहार प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आठ आरोपींना सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी याप्रकरणी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “या विषयवार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही?”, असा जळजळीत प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचे पण काही वाटणे बंद झाले आहे का? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?”राज ठाकरे यांनी यावेळी राम मंदिर आंदोलनाचाही आठवण करून दिली. “अयोध्येत राम मंदिर उभे करण्यासाठी १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन केले. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिले. हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचे नव्हते. त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटले नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटले नाही”, असा दाखला राज ठाकरे यांनी दिला.


