शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन पक्ष विलीनीकरण करणार असल्याची बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संजय राऊत, नाना पटोलेंपासून अनेक दिग्गज नेत्यांकडून समविचारी पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे मत मांडले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर सावध भूमिका घेण्यात आली होती. पण आता शरद पवार यांना थेट केंद्रीय मंत्र्यांकडून ऑफर देण्यात आली आहे. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याऐवजी भाजपमध्ये यावे, अशी थेट ऑफ देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना ही ऑफर दिली. ते सांगलीत पत्रकारांसोबत बोलत होते.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, तर त्यांनी आमच्यासोबत यावे,” असे जाहीर निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिले आहे. आठवले यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय समिकरणाची चर्चा सुरू झाली आहे.”शरद पवारांनी आमच्यासोबत यावे; जर त्यांना थेट भाजपमध्ये जायचे नसेल, तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावे, आम्ही त्यांना भाजपसोबत घेऊन जाऊ,” असे सूचक विधानही रामदास आठवले यांनी केले आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. रामदास आठवले यांच्या या वक्तव्याने सांगलीत राजकीय चर्चेला उधाण आलेय. पवारांकडून आठवलेंच्या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया येते,याकडे सर्वांच्या नजरा खिळल्यात.


