Tuesday, November 11, 2025

जागावाटपावरून तू तू – मैं मैं चालू होतं… विधानसभेच्या पराभवावर उध्दव ठाकरेंचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपाप्रणित महायुतीला धोबीपछाड दिला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. या सहा महिन्यात महाविकास आघाडीचं नेमकं काय चुकलं? याचं विश्लेषण शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत विधानसभेच्या पराभवाबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

पक्षप्रमुख म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आपण तीन प्रमुख पक्ष एकत्र आलो होतो. जागावाटपावरून आपल्यात खेचाखेच झाली, तशीच खेचाखेच महायुतीतही झाली. महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदार संघ आपण आपल्या मित्रपक्षांसाठी सोडले. तसेच आपल्या मित्रपक्षांनी देखील सोडले. परंतु विधानसभेला सगळ्यांच्याच बाबतीत तसं घडलं नाही. शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपावरून खेचाखेच चालू राहिली. मला-तुला, तू तू – मैं मैं असं शेवटच्या क्षणापर्यंत चालू होतं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की जनतेत एक वाईट संदेश गेला. यांच्यात (मविआ) आत्ताच इतकी खेचाखेच चालू असेल तर नंतर काय होईल असा प्रश्न लोकांना पडला.

आपल्या अपयशाचं दुसरं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी मी फेब्रुवारी महिन्यात प्रचाराला सुरुवात केली होती. त्यावेळी माझ्यासमोर माझे उमेदवार होते. परंतु, माझ्याकडे निवडणूक चिन्ह नव्हतं. विधानसभेला मात्र माझ्याकडे चिन्ह होतं, परंतु जागा कुठल्या असणार, कुठल्या जागेवर मी कोणता उमेदवार देणार हे ठरलं नव्हतं. ही आपल्याकडून झालेली मोठी चूक होती. जागावाटपावरून तू तू – मैं मैं चालू होतं.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीवेळी जे घडलं तीच चूक आपल्याला परत करायची असेल तर अशा एकत्र येण्याला काहीच अर्थ नाही. या सगळ्याला समन्वयाचा अभाव असं म्हणण्यापेक्षा लोकसभेवेळी मिळालेले यश काही लोकांच्या डोक्यात गेलं होतं ही गोष्ट मान्य करावी लागेल. मविआत लोकसभा निवडणुकीवेळी आपलेपणा होता, विधानसभेला मात्र मीपणा समोर आला आणि आपला पराभव झाला.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles