नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाने नाशिक जिल्हा हादरला आहे. येथील पेठ तालुक्यात भूकंपाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. पण सलग बसणाऱ्या धक्क्यांमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजता नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य हादरे नोंदवले गेले. ६ गावांची जमीन हादरल्याची माहिती आहे. गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे या ग्रामीण परिसरात भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले.
घरात भांडी आणि वस्तू हलल्याचे जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर सुरक्षित ठिकाणी धावले. काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्हा भूकंपाने सारखा हादरत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे होतोय? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. सतत बसणाऱ्या या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. भूगर्भशास्त्र तज्ज्ञांमार्फत या भूकंपाच्या कारणांचा आणि केंद्रांचा अभ्यास केला जात आहे.या धक्क्यांची तीव्रता ३.२ ते ४.३ रिश्टर स्केलदरम्यान राहिली आहे. काही दिवसांपूर्वी दिंडोरीतील भनवड परिसरात सर्वाधिक ४.३ रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमधील गावांना यापूर्वीही वारंवार भूकंपाचे हादरे बसले असून, काही भागांतील घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत.


