अहिल्यानगर-पिंपळगाव माळवी (ता. अहिल्यानगर) येथे खासगी रस्त्याच्या मालकीवरून उद्भवलेल्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना शनिवारी (12 जुलै) दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.सहादु गंगाधर शिंदे (वय 69, रा. पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण शामराव बिडवे, रतनबाई लक्ष्मण बिडवे (दोघे रा. पिंपळगाव माळवी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहादु शिंदे यांनी आपल्या पिंपळगाव माळवी येथील मालकी हक्काच्या रस्त्यावर लक्ष्मण बिडवे ट्रॅक्टर घेऊन जात असल्याचे पाहून विरोध केला. यावरून संतप्त झालेल्या लक्ष्मण बिडवे याने सहादु शिंदे यांना शिवीगाळ करत मारहाण केली, असा आरोप केला आहे.
दरम्यान, भांडणात सहादु शिंदे यांची पत्नी व मुलगा मध्ये पडले असता रतनबाई लक्ष्मण बिडवे हिने त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद आहे. तसेच या घटनेत संशयित आरोपीच्या बाजूनेही फिर्याद दाखल झाली असून, सहादु शिंदे व त्यांच्या नातेवाईकांनी ट्रॅक्टरला अडवून रस्त्यात अडथळा केला, शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. रतनबाई लक्ष्मण बिडवे (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहादु गंगाधर शिंदे, सुरेश शहादु शिंदे यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


