शिवसेना (ठाकरे) पक्षातून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ खासदारांच्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली जिल्ह्यात जाहीर सभा पाडल्या आहेत. यानंतर आज (२८ जून) उद्धव ठाकरे यांची धाराशिव जिल्ह्यात जाहीर सभा पार पडली आहे. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सहा खासदार फुटण्याच्या आधी बोलावलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं? याचाही खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला. त्याच बरोबर सहा खासदार फुटण्याच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं होतं? ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी कशी केली होती? ओमराजे निंबाळकर यांच्याशी रात्री फोनवर काय बोलणं झालं होतं? याबाबत उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.“तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओमराजे निंबाळकर यांना जपण्याचा म्हणजे मनधरणी करण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी मध्यरात्री दीड वाजता मी आमदार कैलास पाटील आणि आमदार वरुण सरदेसाई यांना ओमराजे निंबाळकर यांना भेटण्यासाठी पाठवलं होतं. तेव्हा ओमराजे निंबाळकर यांच्याशी मी फोनवर बोललो होतो. मी ओमराजे निंबाळकर यांना म्हटलं होतं की, हे बघा मला ओमराजे पाहिजे आहेत आणि त्यांना (शिंदेंना) खासदार पाहिजे. त्यामुळे तुम्ही ठरवा. मी माणसं जपणारा माणूस आहे. मात्र, आता मला कळतंय की हा व्यक्ती माणूस म्हणण्याच्या पण पात्रतेचा नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली.


