घर आणि आरोग्य सांभाळत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कर्नाटक सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यात पहिल्यांदाच सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील महिलांना मासिक पाळीसाठी वार्षिक 12 रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे कर्नाटक हे देशातील पहिलेच राज्य आहे.
कर्नाटक राज्याने महिलांबाबत लागू केलेला हा निर्णय प्रगतीशील असून तो राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, वस्त्रोद्योग, आयटी कंपन्या आणि खासगी क्षेत्रातील संस्थांसाठी बंधनकारक असणार आहे.
कायद्याची अंमलबजावणी व प्रतिक्रिया या कायद्याअंतर्गत, महिला कामगारांना महिन्यातून एकदा मासिक पाळीबद्दल पूर्ण वेतनासह रजा घेण्याचा अधिकार असेल. ही रजा कोणत्या दिवशी घ्यायची याचा निर्णय ती महिला घेईल. या निर्णयामुळे महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे.महिलांना मासिक पाळीच्या दिवशी पगारी रजा मंजूर करण्याचा प्रस्ताव अनेक राज्यांच्या सभागृहामध्ये आहे. पण यासंबंधी एक परिपूर्ण आणि व्यापक प्रस्ताव कर्नाटकमध्ये सादर करण्यात आला आणि त्याच्या अंमलबजावणीचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे असा निर्णय घेणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.


