वंचित बालकांचा सामूहिक जन्मदिन अनोखा – श्री. सोमनाथ घारगे..
अहमदनगर,वंचित बालकांसाठी स्नेहालय संस्थेने हक्काचे सुरक्षित घर, प्रेमाचे गणगोत आणि उज्वल भविष्य दिले. येथील बालकांचा सामूहिक जन्मदिन दरवर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनी साजरा करण्याची संस्थेची प्रथा बाल विकासाच्या क्षेत्रात अद्वितीय असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केले.
स्नेहालय संस्थेतील बालकांच्या आयुष्यात आनंदाचे बिजारोपण करणारा सामूहिक जन्मदिन सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. श्री.घारगे यांनी या आनंदोत्सवाचे उद्घाटन केले..
संस्थेच्या विश्वस्त आणि उपक्रमाच्या निमंत्रक सौ.सपना आसावा यांनी नमूद केले की,
“संस्थेतील बालकांच्या जन्माची बिनचूक नोंद अनेकदा नसते.त्यामुळे सर्वांचा वाढदिवस एकाच दिवशी आशयसंपन्न पद्धतीने साजरा करण्याची अनोखी पद्धत संस्था राबवते. तो दिवस स्वातंत्र्य दिन असल्याने देशभक्तीची भावना बालमनात पेरली जाते”.
यावेळी वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या आणि 19 71 सालच्या भारत पाकिस्तान युद्धात अतुल्य शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिक निवृत्ती भाबड यांचा त्यांची पत्नी सौ.मीरा यांच्यासह श्री घारगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आवडीचे कपडे आवडते भोजन
दरवर्षी मुलांच्या जन्मदिनी त्यांना त्यांच्या आवडीचे नवे कपडे त्यांना स्वतःच दुकानातून खरेदी करता यावेत, त्यासाठी श्री. संजय गुगळे यांच्या कल्पनेतून एक अभियान जून महिन्यापासून राबवले जाते. त्यास यंदाही दात्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
स्नेहालयच्या अध्यक्षा जया जोगदंड,सचिव डॉ प्रीती भोंबे,खजिनदार गीता कौर, सौ राधा कुलकर्णी , रूपाली मुनोत, डॉ अंशू मुळे, वैशाली चोपडा, राजीव कुमार, राजीव गुजर, मिलिंद कुलकर्णी , एड. शाम आसावा, संस्थेचे सर्व प्रकल्प संचालक, समन्वयक, आणि कर्मचारी – कार्यकर्त्यांनी उपक्रमाच्या आयोजनात योगदान दिले.
यावेळी मुला मुलींनी मानवता आणि देशभक्तीवर आधारित गाण्यांव समूहनृत्य सादर केली. रंगीबेरंगी वेशभूषा, तालावर थिरकणारे पाय यांसाठी सामाजिक जाणीव जपणारे कोरिओग्राफर यांनी सलग दोन महिने सराव करून घेतला होता.
या कार्यक्रमात प्रख्यात अन्नपूर्णा केटरर्स यांनी दरवर्षीप्रमाणे मुलांच्या आवडीची खाद्यसेवा दिली. याबद्दल अन्नपूर्णा केटरर्सचे श्री संजय गुगळे यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला..
‘स्नेहालय उन्नती फूड प्रॉडक्ट्स’ या उपक्रमाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
स्वादिष्ट चिवडा, उत्कृष्ट मुखवास, खास शेंगदाणा चटणी आणि दर्जेदार चहा मसाला याचे उत्पादन आणि विक्री आरंभ करून स्नेहालयाने स्वयंपूर्णतेकडे आणखी एक पाऊल टाकले.
या अनोख्या सोहळ्याचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते आणि नामवंत सूत्रसंचालक उद्धव काळापाहाड यांनी केले .


