जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
गुणवंत क्रीडापटू व मार्गदर्शकांना गौरवित करण्यासाठी शासनाकडून पुरस्कार
अहिल्यानगर, – जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२४–२५ या वर्षासाठी जिल्ह्यातील एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत पुरुष खेळाडू, गुणवंत महिला खेळाडू व गुणवंत दिव्यांग खेळाडू अशा एकूण चार पुरस्कारांसाठी अर्ज ३१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.
या पुरस्कारासाठी १ जुलै २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीसाठी केलेल्या कामगिरीचा विचार केला जाणार असून, खेळाडूंच्या बाबतीत मागील पाच वर्षांतील कामगिरी व क्रीडा मार्गदर्शकांच्या बाबतीत मागील दहा वर्षांची कामगिरी विचारात घेतली जाणार आहे.
गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूने पुरस्कार वर्षासह मागील पाच वर्षांतील किमान दोन वर्षे जिल्ह्याच्या मान्यताप्राप्त अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्याने सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे व पुरस्कार वितरित होणाऱ्या वर्षात वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी.
क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या दहा वर्षांत किमान वरिष्ठ गटातील राज्य किंवा राष्ट्रीय पदक विजेते, तसेच कनिष्ठ शालेय गटातील राज्य ते राष्ट्रीय पातळीवरील पदक विजेते खेळाडू घडवलेले असावेत. सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेला खेळाडू अथवा राज्य/जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र राहील. अर्ज विहित नमुन्यात संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरित्या सादर करणे आवश्यक राहील.
अर्जाचा नमुना ७ ते २१ जुलै २०२५ दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथून प्राप्त करून परिपूर्ण अर्ज बंद लिफाफ्यात विहित मुदतीत सादर करावेत. पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


