नगर कल्याण रोड परिसरात वाढत्या घरफोडी व गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत

कल्याण रोड परिसरात वाढत्या घरफोडी व गुन्हेगारीमुळे पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
नगरसेवक पै.महेश लोंढे यांच्यासह नागरिकांच्या शिष्टमंडळाचे विभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन
रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचालींमुळे नागरिक भयभीत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरात घरफोडी, चोरी आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः गणेशनगर, माधवनगर, भावना-ऋषी सोसायटी आणि साईराम सोसायटी परिसरातील रहिवाशांनी आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासनाने या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक पै. महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहराचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सादर दिले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या समस्या याकडे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कल्याण रोड भागातील गणेशनगर, माधवनगर, भावना-ऋषी सोसायटी आणि साईराम सोसायटी परिसरात मागील काही काळात घरफोडी, चोरी तसेच इतर गुन्हेगारी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
नागरिकांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी या भागात संशयास्पद व्यक्तींची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी अपरिचित व्यक्तींच्या हालचालींबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून त्यामुळे रहिवाशांना सतत असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने निवेदनात दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी शिवाजीनगर परिसरातील कवडे मळा येथे घडलेल्या खुनाच्या घटनेचाही उल्लेख केला. अशा गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये आणखी भीती निर्माण झाली असून संबंधित प्रकरणात कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नियमित पोलीस पेट्रोलिंग वाढविणे, रात्रीच्या वेळी विशेष गस्त पथके तैनात करणे, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे तसेच आवश्‍यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles