जनादेशाशी गद्दारी करणाऱ्या खासदारांना ‘राष्ट्रीय भ्रष्टांजली’!
पक्षांतराच्या चर्चांवर पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा इशारा; लोकशाहीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह
जनादेशाचे अपहरण म्हणजे लोकशाहीचे वस्त्रहरण -अॅड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मतदारांनी एखाद्या विशिष्ट पक्षाची विचारसरणी, धोरणे आणि कार्यक्रम यांवर विश्वास ठेवून निवडून दिलेले खासदार सत्तेच्या मोहापोटी अथवा वैयक्तिक लाभासाठी आपल्या पक्षाचा त्याग करून सत्ताधारी पक्षात सामील होत असतील, तर अशा लोकप्रतिनिधींना पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने प्रतीकात्मक ‘राष्ट्रीय भ्रष्टांजली’ वाहण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
ही मोहीम कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून लोकशाहीला पोखरणाऱ्या भ्रष्ट आणि स्वार्थी मानसिकतेविरोधात असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या लोकसभेतील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि जनलोक अदालत यांच्या वतीने लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
जनतेने दिलेला जनादेश ही कोणत्याही लोकप्रतिनिधीची वैयक्तिक मालमत्ता नसून सार्वजनिक विश्वासाची अमानत आहे. त्यामुळे त्याचा वापर सत्तावाटप, राजकीय सौदेबाजी, संपत्ती, प्रतिष्ठा अथवा वैयक्तिक फायद्यासाठी केला जाऊ नये, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
यावेळी पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. कारभारी गवळी यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘पसायदान’चा संदर्भ दिला. ते म्हणाले, “पसायदान ही केवळ धार्मिक प्रार्थना नाही; ती समाजकल्याण, विश्वमैत्री, नैतिकता आणि कर्तव्यनिष्ठेची सार्वत्रिक शिकवण आहे. दुष्ट प्रवृत्तींचा अंधार दूर व्हावा, सर्व जीवांमध्ये मैत्री निर्माण व्हावी आणि प्रत्येकाला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, ही पसायदानामागील व्यापक भूमिका आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासाशी प्रतारणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पसायदानातील मूल्यांचे स्मरण ठेवले पाहिजे.”
पीपल्स हेल्पलाईन आणि जनलोक अदालत यांच्या वतीने मांडण्यात येणारे ‘जनलोक आरोपपत्र’ हे कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेचा भाग नसून जनतेच्या नैतिक न्यायपीठासमोर ठेवण्यात आलेले प्रश्नपत्र आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. जनतेच्या कल्याणासाठी मिळालेला जनादेश काही लोकप्रतिनिधींनी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेसाठी गहाण ठेवल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
आजच्या राजकारणातील स्वार्थी प्रवृत्तीवर भाष्य करताना संघटनेने म्हटले आहे की, मतदार “मला काय मिळेल?”, उमेदवार “माझी सत्ता कशी वाढेल?” आणि राजकीय पक्ष “आमचे संख्याबळ कसे टिकेल?” या प्रश्नांभोवती राजकारण फिरत आहे. या सर्व प्रश्नांच्या केंद्रस्थानी ‘मी’ आणि ‘आम्ही’ असतात; मात्र ‘सर्वांचे कल्याण’ हा विचार मागे पडतो.
या आत्मकेंद्री आणि व्यवस्थेला पोखरणाऱ्या प्रवृत्तीला संघटनेने ‘लोक-कर्क’ अशी संज्ञा दिली आहे. अशा प्रवृत्ती लोकशाहीतील विश्वास, सार्वजनिक संसाधने आणि जनतेने दिलेली राजकीय शक्ती स्वतःच्या वाढीसाठी वापरतात, असे संघटनेचे म्हणणे आहे.
महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा संदर्भ देत अॅड. गवळी म्हणाले, “द्रौपदीचे वस्त्रहरण हा केवळ एका स्त्रीवरील अन्याय नव्हता, तर संपूर्ण व्यवस्थेच्या नैतिक अपयशाचे प्रतीक होता. त्याचप्रमाणे आज जनादेशाचे अपहरण होत असताना अनेक जण मौन बाळगत आहेत. मतदारांनी एका विचारधारेसाठी दिलेले मत दुसऱ्याच राजकीय व्यवहारासाठी वापरणे म्हणजे लोकशाहीचे वस्त्रहरण होय.”
अशा राजकीय व्यवहारांची किंमत केवळ मतदारांनाच नव्हे, तर संविधान, सार्वजनिक संस्था, समाजातील दुर्बल घटक आणि भावी पिढ्यांनाही मोजावी लागते, असे त्यांनी नमूद केले.
‘राष्ट्रीय भ्रष्टांजली’ ही भ्रष्ट मानसिकतेविरोधातील प्रतीकात्मक निषेधांजली आहे. सत्ता ही सुखभोगाचे साधन नसून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आहे, याची जाणीव लोकप्रतिनिधींना करून देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे अॅड. गवळी यांनी सांगितले.
मतदान केल्यानंतर पुढील पाच वर्षे निष्क्रिय राहणारा मतदारही या प्रक्रियेचा अप्रत्यक्ष भागीदार ठरतो. त्यामुळे लोकशाहीत नागरिकांनी केवळ मतदार म्हणून न राहता लोकशाहीचे सहमालक, जागरूक निरीक्षक आणि नैतिक लेखापरीक्षक म्हणूनही भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
‘जनलोक आरोपपत्र’ हे सूडाचे हत्यार न बनता आत्मपरीक्षणाचे साधन ठरावे आणि ‘राष्ट्रीय भ्रष्टांजली’ ही व्यक्तिविरोधी मोहीम न होता भ्रष्ट प्रवृत्तीच्या अंताची घोषणा ठरावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
जनादेशाशी विश्वासघात करून सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात ही जनजागृती मोहीम उभारण्यासाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, अॅड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, अॅड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, अॅड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
जनादेशाशी गद्दारी करणाऱ्या खासदारांना ‘राष्ट्रीय भ्रष्टांजली’!
- Advertisement -


